श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स
श्री. अनघा – दत्त
केवळ विद्वानांचाच नाही तर सर्व साधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्तअवतार, दत्ताचा जन्म झाला आहे.
श्री दत्तगुरुचे तत्व कल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ रुप पण आहे. ही माहीती बऱ्याचश्या पंडीतानाही नाही. नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रुपांत मात्र ‘अनघा-स्वामी’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नांव ‘अनघा देवी’ आहे. जी साक्षांत लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहीक सुख, तत्वज्ञाना व्दारा अनुग्रहीत करीत असतात. या दिव्य दांपत्याच्या अष्ट सिद्ध पुत्रांचा अवतार झाला आहे.
पद्मासनस्थां पदयुग्मनूपुरां पद्मं दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्र्चलाक्षींदत्तानुरक्ताम् अनघां प्रपद्ये॥
श्रीप्रभूंच्या दत्तावताराला ‘स्मर्तृगामी’ (स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत) असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपा-चरण, भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर, संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपा वर्षाव करतात.
या अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत: सांगितली, ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.
भावीश्योतर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्तपुराण इ. ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचाश्रमी आहेत. गृहस्थाश्रमाचे आचरण ही त्यांनी केलेले आहे. अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्षमी रूप आहे. या दाम्पत्यास ‘ निमी, ह्रिमान, किर्तीमान, जितात्मा, मुनीवीर्यक, दिप्तीरोम, अंशुमन, शैलाभ ‘ अशी आठ पुत्र आहेत.
श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्यस्थितीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्यशक्ती आहे. या दिव्यशक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.