श्री. अनघा - दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स
श्री.नृसिंह सरस्वती स्वामी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव काळे यांच्या पोटी श्रीगुरु नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. श्री महाराजांचा शततारका नक्षत्रावर जन्म झाला व जन्म नाव शाळिग्रामदेव हे होते. नंतर मोठ्या थाटाने त्यांचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यवहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.
जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले.
नरहरी दिवसागणिक वाढू लागला. पण तो ॐ काराशिवाय काहीच बोलत नसे. आई -वडिलांनी त्याला बोलावयास शिकविण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी सात वर्षांचा झाला. आठव्या वर्षी यांची मुंज करावयास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची? याला गायत्रीमंत्र कसा शिकवावयाचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. आपल्या नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली. त्याचक्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या.
तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई-वडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, “बाळा, महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस; पण तू बोलत का नाहीस ? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर.” नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून ‘तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन’ असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला.त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभ मुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, “माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली; पण तो गायत्रीमंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकविणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, “काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाहीतर न शिको”. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री-मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य! नरहरीने गायत्री-मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच, नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणून लागला. दुसरी भिक्षा घालताच, यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच, सामवेद म्हणून लागला. सात वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणून लागले, “अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरू दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो!” सगळे लोक नरहरीचा जयजयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्यरूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली.
आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुबू लागले. मग नरहरी आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, “मी आता तीर्थयात्रेला जातो. मी सन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या.” मग तो आईला म्हणाला, “माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन.” नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, “माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार?” असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, “माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला चार पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही.” असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याचक्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले की, आपला नरहरी म्हणजेच श्रीपादश्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, “माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे.
नरहरी आपल्या आईला म्हणाले, ”आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.” हे ऐकून आईला फारच दुःख झाले.”जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.” असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली. नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ”आमची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.
जे जे असती माझ्या प्रेमी lत्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी । लौकिकमते अविद्याधर्मी lजातो श्रीशैल्ययात्रेसी ।।
श्री गुरु म्हणाले, ”जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांती लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ”लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.” असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोहचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.